संजय राऊत ईडीच्या ताब्यात; शिवसेनेला मोठा धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना अखेर ईडीने ताब्यात घेतलं आहे. पत्राचाळ प्रकरणी आज सकाळपासुन ईडी कडून संजय राऊतांची चौकशी सुरु होती. अखेर संजय राऊत याना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांच्यावरील या कारवाईमुळे आधीच अडचणीत असलेल्या शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आज सकाळी ७ च्या सुमारास ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी दाखल झाले होते. त्यानंतर जवळपास ९ तास त्यांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच अनेक कागदपत्रांची तपासणी ईडीकडून करण्यात आली आहे. यानंतर संजय राऊत याना ईडीने ताब्यात घेतले आहे. सकाळपासूनच त्यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच मुंबईतील बलार्ड पिअर भागातील ईडी कार्यालयाजवळ मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. त्यामुळे राऊतांना आज अटक होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं आहे

दरम्यान, सकाळपासुन संजय राऊतांच्या घराबाहेर कार्यकर्त्यानी जमाव केला आहे. राऊतांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर भाजप करत असून विरोधकांना नामोहरम करण्याचा हा प्रयत्न आहे असा दावा सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच आता संजय राऊत याना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.

काय आहे पत्राचाळ प्रकरण-

मुंबईतील गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला आणि 2008 साली पत्राचाळ पुनर्विकास हा प्रकल्प सुरू झाला. म्हाडा, गुरूआशिष बांधकाम कंपनी आणि रहिवाशांमध्ये या घरांच्या पुनर्विकासासाठी तीन पार्टी करार झाला. 13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं.मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. याप्रकरणी गुरुआशिष बांधकाम कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना ईडीने 2 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केली होती. प्रवीण राऊत शिवसेना नेते संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात.

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणांमध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातुन संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ५५ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. यातून त्यांनी दादर येथे फ्लॅट खरेदी केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. ईडीनं जप्त केलेल्या मालमत्तेत प्रवीण राऊत यांचे अलिबागमध्ये आठ भूखंड आणि वर्षा राऊत यांचा फ्लॅटचा समावेश होता.