‘मुख्यमंत्र्यांना काही हौस नाही’.. विरोधकांच्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मंदिरं उघडली जावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. योग्य वेळी निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता आहे. सगळं बंद करण्याची त्यांना काही हौस नाही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावलं आहे. विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये, असे त्यांनी खडसावले. अनेक मंदिरं आणि देवस्थानांनी कोविडशी लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. याशिवाय औरंगाबाद, पंढरपूरमध्ये झालेल्या आंदोलनात नियमांचा फज्जा उडाल्याचे ते म्हणाले. सामना कार्यालयात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मुंबईत काल कोरोना रुग्णांचा अचानक आकडा वाढला. महाराष्ट्र आणि देशातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्याच्यात भर पडू नये आणि लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भावना असेल तर भूमिका समजून घेतली पाहिजे. विरोधकांनी त्यावर मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली पाहिजे. रस्त्यावर उतरुन अधिकचे संकट वाढवू नये. लोकांच्या जीवाशी खेळू नका. संयम बाळगणे महत्वाचे आहे. घाई करुन चालणार नाही, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले.

विरोधकांना सरकारकडे मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. ते सुद्धा लोकशाहीचे, घटक आहेत. भूमिका मांडण्याचा त्यांनाही अधिकार आहे. पण हे करताना भान ठेवले पाहिजे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घ्या. महाराष्ट्र सरकार कोरोनाला देवाची करणी मानत नाही. या संकटाशी आपल्याला लढायचे आहे, हे माहिती असतानाही विरोध असे वागत असतील तर हे जनतेच्या हिताचे नाही, असे ते म्हणाले.

सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे घटनेत लिहीलेय का, असा सवाल त्यांनी केला. बदल्या राज्याच्या हिताच्या असल्याचे ते म्हणाले. तर मुख्यमंत्री दौरा करत नसल्याच्या विरोधकांच्या आरोपालाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत सारखीच असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही दिल्लीतूनच काम करत आहेत, ही काळाची गरज आहे असे राऊत म्हणाले. मुंबईत परतू नये म्हणून राऊतांनी धमकी दिल्याच्या आरोपांवर संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत, असे राऊत म्हणालेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

Leave a Comment