उद्धवजी नियम तोडल्यास जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत; पोहरादेवी गर्दी प्रकरणी कारवाई होणार- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळं पोहरादेवीत गर्दी जमवल्याप्रकरणी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

”पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल”, असे संजय राऊत यांनी म्हटले. तर संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावर मुख्यमंत्री आणि शरद पवार नाराज आहेत का, याबाबत बोलण्यास राऊत यांनी नकार दिला.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत अनेक बातम्या माध्यमात आल्या आहेत. या सर्व बातम्यांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment