‘राजकीय चर्चा करणं हा काय गुन्हा आहे का?’ फडणवीसांसोबतच्या भेटीवर राऊतांचा प्रतिप्रश्न

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांना आणखी हवा देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. “जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होणार,” असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी भेटीनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना चर्चेवर खुलासा केला आहे.

संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का ? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयकं, जम्मू काश्मीर. चीन, पाकिस्तान, कोविडबद्दल चर्चा होते”. संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या मध्यावधी निवडणुकीच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता, राज्यपालांना भेटावं लागेल असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

फडणवीस-राऊत भेटीवर काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
“जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेत भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होणार. तर ते दोन ते अडीच तास एकत्र बसले असतील तर चहा बिस्किटावर चर्चा करणार नाहीत. पण ही कोणतीही निर्णयात्मक बैठक नव्हती” असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस-राऊत भेटीमागे आपला कयास लावला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like