हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र सरकारने 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांच्या पाट्या मराठीत असणं बंधनकारक केलं आहे. सरकारने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे श्रेय माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे असं म्हंटल होत. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत कोणाच्या बोलण्यावरून शिवसेना धोरण ठरवत नाही अस म्हंटल आहे.
संजय राऊत म्हणाले, कोणी काय सल्ला दिला आहे. यावर शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली त्यावेळीपासून हे आंदोलन सुरु आहे. मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे. आमच्या पक्षातूनच अनेक जण मराठीचा विचार घेऊन बाहेर पडले आहेत.त्यामुळे कोणी काय बोलल तर त्यावर शिवसेनेचे धोरण ठरत नाही असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते-
दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट करत याचे श्रेय हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे असं म्हंटल होत. २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला. आंदोलनं केली. शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. सरकारने आता हा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये असं राज ठाकरे म्हणाले होते.