हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोकमधून राज्यातील करोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. राज्यातील स्थिती आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवर राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्रासह देशाची गती मंदावली असली तरी राजकारणाचा वेग जोरात आहे. तेथे कोरोनाचे भय अजिबात नाही. प. बंगालात विधान सभेचे तीन टप्पे पार पडले. हजारोंचे रोड शो, लाखोंच्या सभांत कोरोनाचा लवलेशही आढळला नाही. मथुरेत होळी साजरी झाली. त्यात लाखो लोकांनी भाग घेतला. ‘लॉक डाऊन’चे दरवाजे देवाचिया द्वारी तुटून पडले, पण त्यामुळे करोना संपूर्ण खतम झाला असे घडले नाही,” असं राऊत म्हणाले.
महाभारताची लढाई 18 दिवस चालली. तुम्ही मला 21 दिवस द्या. 21 दिवसांत कोरोनाला हरवू, असे पंतप्रधान म्हणाले होते. आज एक वर्षानंतरही कोरोनाची लढाई व लॉक डाऊनची भीती कायम आहे. कोरोना हरणार नाही. ममता बॅनर्जी यांना हरवण्यासाठी सरकारने शक्ती पणाला लावली, अशी टीकाही शिवसेनेनं केली आहे.
मुंबईसारख्या शहरातले कोविड सेंटर्स आज पूर्ण भरले आहेत. नव्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत अशी स्थिती आहे. श्रीमंतांच्या खासगी रुग्णालयांतही जागा नाही. असे अभूतपूर्व संकट आज महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. संपूर्ण देशात कोविडचा कहर आहे, पण महाराष्ट्र त्यात एक पाऊल पुढे आहे हे दुर्दैव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार सांगत होते, ‘हात धुवा, मास्क लावा, अंतर पाळा.’ तेव्हा त्यांच्यावर टीका करणारा विरोधी पक्ष आता यावर काय उपाययोजना देणार? असा प्रश्नही शिवसेनेनं केला आहे.
करोना ही अंधश्रद्धा वगैरे नसून महामारीचे संकट आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन काळात लोकांना थाळ्या व टाळ्या पिटायला लावलं. पण त्यामुळे करोना गेला नाही. करोनाचा संबंध कोणत्याही जाती-धर्माशी नाही. त्यामुळे घंटा बडवून, अजान देऊनही तो थांबणार नाही. आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे, पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉकडाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला होता; पण पुन्हा लॉकडाऊन नको ही त्यांची भावना चुकीची नाही,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page