संजय राऊतांचा सणसणीत टोला; संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत..

नवी दिल्ली । दिल्लीत गेल्या ७५ दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. “शेतकऱ्यांसाठी कोणाच्याही डोळ्यात अश्रू येत नाही. संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत, पण त्याच्यावर सर्वजण मौन बाळगून आहेत आणि त्या आंदोलनाची चेष्टा आणि थट्टा करताहेत, ते नौटंकी आहे असं म्हणताहेत. हा फार विचित्र प्रकार आहे” असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

“लाखोंच्या संख्येने शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर आहेत. दोनशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण आजारी पडलेत. घर दार टाकून थंडी वाऱ्यात म्हातारे शेतकरी कुडकुडत बसले आहेत. अश्रुंचा महापूर यावा, राज्यकर्त्यांच्या डोळ्यात, असा हा प्रसंग असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलं आहे. “नरेंद्र मोदी यांनी फार चांगल्या पद्धतीने कारभार पाहिला आहे. मुख्यमंत्री असताना त्यांच्या भावनेचा कधी बांध फुटला नाही तर ते कठोर राज्यकर्ते म्हणून काम करत होते. पण जेव्हा ते दिल्लीत आले तेव्हा पहिल्या दिवसापासून अधूनमधून भावनेचा बांध फुटतोय. त्यांच्या अश्रूंच्या संदर्भात कोणीही राजकारण करू नये अथवा चेष्टा करू नये” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

शेतकरी दिल्ली सीमेवर कोणत्या परिस्थितीत राहतोय हे पाहून आपल्या राज्यकर्त्यांच्या भावना अनावर व्हायला पाहिजेत. हाथरसच्या घटनेवर कोणी अश्रू ढाळले नाहीत. महाराष्ट्रात पूर्वी काही प्रकार घडले त्यावर अश्रू येत नाहीत. खरं तर यायला पाहिजेत. राज्यकर्ता हा भावनाविवश असायला पाहिजे. तरच तो राज्यकर्ता” असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like