हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल राज्याच्या 32 जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक पटकावून राज्यात पक्षाची ताकद वाढवली. दापोलीत राष्ट्रवादीची सत्ता आली तर मंडणगड नगरपंचायतीत शिवसेनेचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले. या निकालानंतर शिवसेना नेते रामदास कदम याचे पुत्र योगेश कदम यांनी नाराजी व्यक्त केली. “शिवसेनेचे खच्चीकरण करायचे आणि राष्ट्रवादीचे बळ वाढवायचे,” अशी छुपी निती आमच्याच काही नेत्यांची होती असा गंभीर आरोप कदम यांनी केला.
शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी शिवसेनेवरच गंभीर आरोप केले. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेच्या काही नेत्याची छुपी नीती आता उघड झाली आहे. एकीकडे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे काम आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बळ वाढविण्याचे काम सेनेच्या नेत्यांकडून केले जात आहे. दापोलीच्या नगरपंचायतीत शिवसेनेची पाच वर्ष असलेली सत्ता राष्ट्रवादीकडे गेली आहे.
या निवडणुकीत जे उमेदवार शिवसेनेच्या एबी फॉर्मवर निवडून आले आहेत त्या उमेदवारांपैकी सहापैकी चार राष्ट्रवादीचे लोक आहेत. ते शिवसैनिक नाहीत. म्हणजे एबी फॉर्म भरण्याच्या दोन मिनिटे अगोदर त्यांच्या गळ्यात पट्टे घालण्यात आले. हे निर्णय शिवसैनिकांनी मान्य केले नाहीत, असे कदम यांनी यावेळी म्हंटले.