मुंबई । राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असतानाच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप करताना पाहायला मिळत आहेत. ‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा (MVA Goverment) घटक पक्ष नाही, हे महाराष्ट्रातील विरोधकांनी समजून घेतले पाहिजे. पुन्हा लॉकडाऊन टाळायचा असेल तर लोकांनी जबाबदारीने वागावे. विरोधी पक्षांनीही जबाबदारीचे भान राखावे, असे म्हणत शिवसेनेने (Shivsena) भाजपवर (BJP) टीकेचा बाण सोडला आहे.
‘कोरोना’चा धुमाकूळ पुन्हा सुरू झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. नव्हे, ती आता जाताना दिसत आहे. ‘एम्स’सारख्या सर्वोच्च वैद्यकीय संस्थांनी धोक्याची जाणीव करून दिली. विरोधकांनो, निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागा, बोला. राजकारण करायला उभा जन्म पडला आहे, पण कोरोनाने संधी दिली तर, असेम म्हणत शिवसेनेने निशाणा साधला. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर निशाणा साधला.
काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात?
राज्यात कोरोनाची दुसरी लाट धडक मारते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. राज्यात गेल्या 24 तासांत सात हजारांवर नवे रुग्ण झाले. मुंबई शहरातच हा आकडा हजाराच्या आसपास आहे. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, वर्धा जिह्यांत कोरोना वेगाने पसरतो आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांना समोर येऊन सगळय़ांनाच कडू औषधाचा डोस पाजावा लागला.
निर्बंध सैल केल्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढते आहे. अशा प्रसंगी राजकारण न करता सरकार तसेच विरोधकांनी जनतेचे हित सांभाळावे, एकोप्याने काम करावे असे संकेत आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी ‘लॉक डाऊन’बाबत इशारा देताच विरोधी पक्षनेते दरेकर यांनी वेगळेच टोकाचे विधान केले, ‘‘राज्यात लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नका. जुलमी राजवटीसारखी कृती करू नका.’’ दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय? कोरोना संसर्गाबाबत सत्यस्थिती समोर मांडणे याला काय दहशत पसरवणे म्हणायचे?
कोरोनावरील लस ही नव्या स्ट्रेनविरोधात पुचकामी आहे हे जे डॉ. गुलेरिया तळमळीने सांगत आहेत, तो काय दहशत माजविण्याचा प्रकार आहे? ‘एम्स’चे संचालक देशाला गुमराह करीत आहेत, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन ‘एम्स’च्या दारात जोरदार आंदोलन केले पाहिजे. देशाचे आरोग्यमंत्रीच काय, पंतप्रधान, राष्ट्रपतींचे उंबरठे झिजवून निषेधाची पत्रे दिली पाहिजेत.
जनता जेवढी सत्ताधारी पक्षाची असते तेवढी ती विरोधी पक्षांचीसुद्धा आहे. लॉकडाऊनमुळे लहान व्यापारी, नोकरदार वर्ग, हातावर पोट आहे अशांचे कंबरडे मोडणार हे नक्की. आर्थिक व्यवस्थाही कोसळणार आहेच. त्यासाठी मार्ग काढावा लागेल व पेंद्राने त्याकामी मदत करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला या कामी पेंद्राकडून एखादे विशेष आर्थिक पॅकेज मिळायला हवे. असे आर्थिक पॅकेज मिळावे म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनीही मोदी यांच्याकडे तगादा लावला तरी आमची हरकत नाही. राज्यातील विरोधी पक्ष हा काही पाकिस्तानी किंवा अफगाणी वंशाचा नाही. तो याच मातीतला आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा, देवेंद्र फडणवीस, दरेकर, आशिष शेलार वगैरे मंडळींनी दिल्लीतच ठाण मांडून बसावे व राज्याच्या वतीने एक-दोन हजार कोटींच्या पॅकेजसाठी लढत राहावे. राज्यातून देशाला जो मोठा महसूल मिळतो, त्यातला पुरेसा परतावा महाराष्ट्राला मिळाला तर विरोधी पक्षाला सरकारकडून जे करून घ्यायचे आहे, त्याचा मार्ग मोकळा होईल.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.