हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना मित्रपक्ष काँग्रेसला त्यांच्या स्वबळाच्या भाषेवर कानपिचक्या दिल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करत काँग्रेसने स्वबळाच्या गोंधळातून बाहेर यावं असा खोचक सल्ला दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्या पक्षात देखील एक नेता म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरा नेता म्हणतो ही आमची भूमिका नाही. त्यामुळे आधी त्या सगळ्यांनी गोंधळातून बाहेर यावं. आणि नंतर स्वबळ वगैरे काय आहे त्यावर निर्णय घ्यावा”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. काहींना सत्ता नसल्याने पोटदुखी झाली आहे. अशा लोकांसाठी पोटात घ्यायचे औषध मुख्यमंत्र्यांनी शिवसेना वर्धापन दिनानिमित्तच्या भाषणातून दिलंय. सगळ्यांनी ही गोष्ट समजून घ्या अस म्हणत आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही पण कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घेऊ असा इशारा त्यांनी भाजपला दिला.