हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्षांकडून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात येत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवून महाराष्ट्राच्या स्वायत्तेवर घाला घालत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत म्हणाले, ईडी येऊ द्या किंवा ईडीचे पिताश्री येऊद्या. बाप शब्द मी मुद्दाम वापरत नाही. जो तपास करायचा, तो करा. ईडी, सीबीआय, एनआयएची मुख्यालये मुंबईत आणायचे असतील, तर आम्ही त्यांना बीकेसीमध्ये चांगल्या ठिकाणी जागा देऊ. त्यांना दिल्लीत तसंही काही काम नाहीये. एका फौजदाराला घ्यावं की, नाही घ्यावं याचा निर्णय मुख्यमंत्री घेत नाही. हे निर्णय सिस्टीम घेते. देवेंद्र फडणवीस काहीही म्हणतात. त्यांची प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
तुम्ही केंद्रीय यंत्रणांचा कितीही गैरवापर केला तरी महाविकासआघाडी सरकारला धक्का लागणार नाही. भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केला. उलट केंद्र सरकारच बरखास्त केले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. आम्ही यापुढे विरोधकांच्या आरोपांना उत्तरही देणार नाही, असेही राऊत यांनी सांगितले.
अनिल देशमुखांचा राजीनामा हा राज्य किंवा देशासमोरील एकमेव प्रश्न नाही. राजकारणात विरोधी पक्ष आरोप करणार आम्ही त्याला उत्तर देणार, ही प्रक्रिया निरंतर चालू राहणारी आहे. कालपर्यंत विरोधी पक्षाला परमबीर सिंह यांच्यावर अजिबात विश्वास नव्हता. मात्र, आज त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे असेही राऊत म्हणाले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा