आता तर मोदी मला सरदार पटेलांपेक्षाही मोठे वाटायला लागलेत; राऊतांचा उपरोधिक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केलं. दरम्यान सरदार पटेल यांचं नाव असलेल्या या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आल्यानंतर नवा वाद सुरू झाला असून विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. याच दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील मोदींना उपरोधिक टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले, हा गुजरात सरकारचा निर्णय आहे, आपण त्याबाबत काय करु शकतो, असे म्हटले. गुजरात क्रिकेट बोर्डाने स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचे नाव द्यायला मान्यता दिली असेल. प्रत्येक राज्यात अनेक नेत्यांची नावे अशा प्रकारे दिली जातात. आता स्टेडियमला नाव देण्यास त्या राज्यातील सरकार आणि क्रिकेट संघटनेने मान्यता दिली आहे.  पण आता मला नरेंद्र मोदी हे सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील मोदींवर कडक शब्दांत टीका केली होती. स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावानी मतं मागून थकल्यानंतर त्यांच्या नावानी उभे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतलं, हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते, असं म्हणत आव्हाडांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like