हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि सामना संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहून सामनातील आक्षेपार्ह भाषेबद्दल तक्रार केली होती. दरम्यान, आज पुन्हा एकदा सामनातून चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे. दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरूच केली आहे असा टोला लगावताना महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे.
चंद्रकांत दादांनी पत्र लिहिणं म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरु केली आहे. प. बंगालातील भाजप नेत्यांची अलीकडची भाषणे दादांच्या हवाली करुया. तेथे भाषाशुद्धीसंदर्भात मोठं काम चंद्रकांत पाटलांना करावं लागणार आहे, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली आहे.
चीनने लडाखची जमीन गिळली तरी चालेल, पण मुंबईतल्या इंच इंच जमिनीसाठी किटल्यांनी उकळायलाच पाहिजे! दादा, उचला लेखणी, करा त्या ढोंगावर हल्ला! महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे, असा टोला राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत, पण ‘चायपेक्षा किटली गरम’ असे काही लोकांचे सुरू आहे. उठसूट फक्त विरोध, दुसरे काही नाही. ‘‘मुंबईतील महाकाली गुंफा विकू देणार नाही, एक इंचही जागा बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही’’, अशा विरोधी वक्तव्याच्या उकळ्या काही किटल्यांना फुटल्या आहेत. भाजपच्या ध्यानीमनी, स्वप्नी ‘बिल्डर’च आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही निर्णयात बिल्डरच दिसत असावेत. राज्य सरकारने कोणताही निर्णय घ्यायचा म्हटले की, ‘ब्लॅकमेल’ करणारी किरकिराटी मांजरे आडवी घालायची, हे जणू धोरणच झाले आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’