फडणवीसांना कर्णपिशाचाने ग्रासले आहे काय? सामनातून चौफेर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, ‘विरोधी पक्ष कसला बॉम्ब फोडणार? त्यांच्याकडे लवंगी फटाकादेखील नाही.’ श्री. फडणवीस यांचे हे विधान आश्चर्यकारक आहे. फडणवीस सध्या भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरत आहेत व महाराष्ट्र लुटून खाण्याचा हट्ट सोडायला वेताळ तयार नाही. फडणवीस यांना रोज उठून भ्रष्टाचार व लुटमारीच्या नव्या प्रकरणाची वकिली करावी लागते. असं म्हणत शिवसेनेनं (Shivsena) आपल्या सामना अग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे.

विधानसभेत विरोधकांकडून रोज भ्रष्टाचारविरोधी बॉम्ब फोडले जात आहेत. फडणवीस यांना ते ऐकू जात नसतील तर तो त्यांचा राजकीय कर्णदोष म्हणावा लागेल. फडणवीस हे अभिमानाने सांगत असतात की, ‘महाविकास आघाडीच्या नाकासमोरून आम्ही सरकार पळवून नेले,’ ठीक आहे, पण श्री. फडणवीस तुम्हालाही नाक आहे व त्याच नाकासमोर एनआयटी भूखंडांचा घोटाळा झाला. 110 कोटींचे भूखंड आजच्या मुख्यमंत्र्यांनी दोन कोटींत बिल्डरांना दिले. या सर्व व्यवहारावर हायकोर्टाने ताशेरे ओढले. म्हणजे गैरव्यवहार झाला, भ्रष्टाचार झाला. त्या भ्रष्टाचाराविरोधात विरोधकांनी विधिमंडळात तुमच्या नाकासमोर बॉम्ब फोडले, पण 16 भूखंडांचा भ्रष्टाचार आमच्या फडणवीस साहेबांना भ्रष्टाचार वाटत नाही. विरोधकांनी फोडलेला हा बॉम्ब लवंगी फटाक्याच्याही तोडीचा नाही, असे वाटणे हे सरकारच्या निर्ढावलेपणाचे लक्षण आहे अशी टीका शिवसेनेनं केली.

विधानसभेत सीमाप्रश्नी जो ठराव आणला गेला तो इतका गुळमुळीत की, त्यात सीमा भाग केंद्रशासित करण्यासंदर्भात एक ओळही नाही. ही फसवणूक नाही तर काय? सीमा बांधवांची फसवणूक म्हणजे महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची फसवणूक. महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेला व्यभिचार, पण भ्रष्टाचार आणि राजकीय व्यभिचाराची नोंद घ्यायचीच नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले आहे. सभोवती भ्रष्टाचारविरोधी बॉम्ब फुटत असतानाही ते म्हणतात, “कुठे काय? मला तर लवंगी फटाक्याचाही आवाज ऐकू येत नाही.” या जादूटोण्यास काय म्हणावे? नाकासमोर भ्रष्टाचार सुरू आहे, पण फडणवीसांना काहीच दिसत नाही, ऐकू येत नाही. त्यांना कर्णपिशाचाने ग्रासले आहे काय? असा संतप्त सवाल करत सामनातून फडणवीसांवर चौफेर टीका करण्यात आली आहे.