हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील महिन्यात देशातील १६ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं आपल्या ‘सामना’ अग्रलेखातून मोदी सरकारवर टिकेचा बाण सोडला आहे. तरूणांच्या हाताला काम पाहिले पण भाजपने बेरोजगारांच्या हातात घंटा दिली अशी टीका शिवसेनेने केली. घंटा बडवून बेरोजगारीचा राक्षस मारला जाणार असेल तर देशाच्या उद्योग मंत्रालयानं एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या दारात आता घंटा लावून रोजगारनिर्मितीचे दालन उघडायला हवं,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
ऑगस्ट महिन्यात 16 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. 16 लाख हा आकडा अलीकडचा आहे. मोदी सरकारने जी बेजबाबदार नोटाबंदी देशावर लादली, त्या नोटाबंदीने कोसळलेल्या अर्थव्यवस्थेखालीच दोनेक कोटी रोजगार चिरडला गेला. नोटाबंदी हे अर्थव्यवस्थेवरचे भयंकर संकट होते व त्यातून दोन कोटींवर लोकांनी कायमच्या नोकऱ्या गमावल्या. त्यानंतर कोरोना व लॉकडाऊन आले. या काळातही तितक्याच लोकांनी रोजगार गमावला. व्यापार, उद्योग-व्यवसायांना टाळे लागले, पण ज्यांनी या काळात रोजगार गमावला, जे बेकार झाले त्यांची काय व्यवस्था केली? असा सवाल शिवसेनेने केला आहे.
देशातील उद्योग क्षेत्र थंड पडले आहे. नोकऱ्या गमावल्याने लोकांनी आत्महत्या केल्या. मोदींचे सरकार हे जगातले एकमेव उत्तम सरकार असल्याचे अंध भक्तांचे म्हणणे आहे. या अंध भक्तांनी सरकारची आरती ओवाळायला व मंदिरांच्या नावाने राजकीय घंटा बडवायला काहीच हरकत नाही, पण लाखो लोकांनी रोजगार गमावला आहे आणि त्यातून जे आर्थिक अराजक निर्माण झाले आहे, त्याचे काय? या संकटाचा सामना केंद्र सरकार कसा करणार आहे? नोकऱयांचे काय करणार? घंटा बडवून बेरोजगारी हटणार असेल तर तसे स्पष्ट करावे! असेही शिवसेनेने म्हंटल.