मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन करायला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश निवडणूकीचे वारे सध्या जोरदार वाहू लागले आहे. त्याचाच भाग म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका दलीत कुटुंबात भोजन केल्याचा एक फोटो देशभर पसरला. त्यावरून शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन योगी आदित्यनाथ आणि भाजपवर निशाणा साधला. मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन करायला असा टोला शिवसेनेने लगावला. भाजप पुढाऱ्यांना आजही दलितांकडे दलित म्हणून जेवणाचे कार्यक्रम करून त्याचा बोभाटा करावा लागतो असे शिवसेनेने म्हंटल.

योगी आदित्यनाथ यांनी दलिताच्या घरी जेवण घेतल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. गोरखपूरचे खासदार मनोज तिवारी यांनीही त्याच वेळी दलिताघरी जेवण घेतल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. दलिताला दलित म्हणून हिणवण्याचा हा राजकीय प्रकार आहे. काही वर्षांपासून भाजप पुढाऱयांचा हा नवा सामाजिक परिवर्तनाचा फॉर्म्युला समोर आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी कुंभमेळय़ात गंगास्नान केले व नंतर काही दलितांचे पाय वगैरे धुतल्याचे नाटय’ घडवले. त्यामुळे दलित, मजूर, सफाई कामगारांचे प्रश्न उत्तर प्रदेशात तरी सुटले काय? खास दलितांच्या घरी जेवण्याचा कार्यक्रम घडवणे म्हणजे दलितांच्या बाबतीत आपली वेगळी भूमिका आहे हे स्पष्ट करण्यासारखेच आहे. असे शिवसेनेनं म्हंटल.

एका बाजूला आपण जातीप्रथा संपविण्यासाठी सरकारी कार्यक्रम राबवायचे आणि त्याच वेळी एखादी व्यक्ती दलित आहे, अशी दवंडी पिटवून त्याच्या घरी भोजन मेळावा घ्यायचा हे उपक्रम राबविण्यात भाजपचा हात कोणी धरणार नाही असे शिवसेनेन म्हंटल. भाजपच्या पुढाऱयांना आजही दलितांकडे दलित म्हणून जेवणाचे कार्यक्रम करून त्याचा बोभाटा करावा लागतो याचा सरळ अर्थ असा की, त्यांच्या मनात ‘जात’ आहे व ती जात घालवायची त्यांची तयारी नाही. आज साराच देश राजकीय फायद्या-तोटय़ासाठी जातीय चौकटीत वाटला गेला आहे. त्यामुळे जातीपातीचे निर्मूलन हे थोतांड ठरले आहे असा आरोप शिवसेनेने केला.