टीम हॅलो महाराष्ट्र। शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात उदयनराजेंना शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्या अशी विचारणा करत वादाला आमंत्रण दिलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजपने मैदानात उडी घेत राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. राऊत यांचे वक्तव्य हा शिवरायांचा अपमान आहे असं म्हणत भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवसेनेनं भाजपच्या टीकेला आज समानाच्या अग्रलेखातून प्रतिउत्तर दिलं. शिवसेनेनं उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही वर्षांपूर्वी साताऱ्यातील पेढेवाल्यांशी केलेल्या तुलनेवरुन अग्रलेखातून भाजपाला सुनावले आहे.
अग्रलेखामध्ये, “पंतप्रधान मोदी या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास ‘पेढेवाले’ वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजूने संपूर्ण भाजप उभा ठाकला आहे. म्हणजे मोदी यांची तुलना सातारच्या पेढेवाल्यांशी केली हे भाजप नेतृत्वास बिनशर्त मान्य असेल तर प्रश्नच संपतो, पण राज्याच्या भाजप नेतृत्वाने एकदा तसे स्पष्ट करावे हे बरे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा फक्त स्वराज्यासाठी होता, स्वतःसाठी नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. शिवरायांनी मावळ्यांना स्वराज्याचे ध्येय दिले होते. जुलूमाविरुद्ध लढण्याचे धैर्य दिले होते. हे शिवरायांचे नाव घेऊन विरोधासाठी विरोध करणाऱ्यांनी विसरू नये. शिवराय जरा समजून घ्या इतकेच त्यांना सांगायचे आहे,” असं म्हटलं आहे.
याचसोबत भाजपा हा बेजबाबदार विरोधी पक्ष असून इतका बेजबाबदार विरोधी पक्ष राज्याच्या इतिहासात आधी निर्माण झाला नव्हता असा टोलाही लगावण्यात आला आहे. “भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे आम्ही म्हणतो ते किती खरे आहे, याचे प्रत्यंतर आपल्या कृतीतून ते रोज देत आहेत. मूळ भाजप राहिला बाजूला, पण भाजपात घुसलेल्या इरसाल ‘बाटग्यां’नी ऊठसूट सिलिंडर वर करून ‘बांग’ देण्याचे प्रकार सुरू केले आहेत. हे काही चांगल्या मानसिकतेचे लक्षण नाही. सत्ता हातून सटकल्याने निद्रानाशाचा रोग जडला हे समजू शकतो, पण त्या निद्रानाशातून त्यांना जे झटके व आचके येत आहेत त्यातून महाराष्ट्राच्या इभ्रतीस तडे जात आहेत. इतका बेजबाबदार विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या इतिहासात निर्माण झाला नसेल, पण आधी अक्कल जाते व मग उरलेसुरले भांडवल जाते तसा काहीसा प्रकार सुरू आहे. सोयीनुसार टोप्या घालण्याचे व बदलण्याचे उद्योग सुरू झाले आहेत,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.