हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लॉकडाऊनसंदर्भात भाजपाकडून मांडल्या जाणाऱ्या भूमिकेवर सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावावेच लागेल असे संकेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. विरोधी पक्षाला लॉकडाऊनमुळे लोकांचे अर्थचक्र बिघडेल अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण सध्या माणसांचे प्राण गमावण्याचे जे ‘अनर्थचक्र’ सुरू आहे ते थांबवायचे तर कडक लॉकडाऊन आणि निर्बंध अपरिहार्य असल्याचे मुख्यमंत्र्यांचं सांगणं आहे.
फडणवीस व त्यांच्या पक्षाचे लॉकडाऊनसंदर्भात वेगळं मत आहे. लॉकडाऊन नकोच, तसे काही झाले तर लोकांचा उद्रेक होईल असे जे फडणवीस म्हणतात त्यात अजिबात तथ्य नाही असे नाही, पण करोना संक्रमणाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. आता त्याऐवजी दुसरा काही पर्याय असेल तर फडणवीस यांनी सांगावं. असा प्रश्न सामनातून करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे, पण बाजूच्या गुजरातमध्ये लसीचा महापूर आहे. करोना काळात महाराष्ट्राचीच काय, देशाचीच अर्थव्यवस्था कोसळली हे मान्य करावेच लागेल, पण त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे केंद्राकडून काही राज्यांना मिळत असलेली सापत्न वागणूक. पृथ्वीराज चव्हाण यांनी परखडपणे सांगितले आहे की, महाराष्ट्राला पीपीई किटस्, एन-95 मास्क आणि व्हेंटिलेटर अशी महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे पुरविण्यात सापत्न वागणूक देण्यात आली अस सामनातून म्हंटल आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे भाजप कार्यकर्त्यांनी थाळ्या वाजवून स्वागत केले. आज कोरोनाची परिस्थिती त्यापेक्षाही गंभीर आहे. याचे भान महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ठेवले पाहिजे. त्यामुळे या संकटाकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवे. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत राज्यातील जनतेने का मोजावी? त्यामुळे आतातरी राज्यातील विरोधी पक्षाने दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे. यामुळे भाजपला राज्यहिताचे श्रेय मिळेल व लॉकडाऊन झाले तरी जनतेला दिलासा मिळेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.