मुंबई । आम्ही शिवसेनेच्या वाटेने गेलो असतो तर शिवसेनेचे अस्तित्वच उरले नसते असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो, अशा शब्दांत शिवसेनेने अमित शाह यांच्या विधानाचा पुन्हा एकदा सामानाच्या अग्रलेखातून समाचार घेतला.
महाराष्ट्रातून सत्ता उलथवून टाकल्याचा बाण काळजात घुसला आहे. त्या वेदनेतून सुरू असलेले हे उचकणे आहे. अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? एखाद्याच्या पायगुणात इतकी ताकद असती तर हे महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. शर्थ आणि पराकाष्ठा करूनही ‘ठाकरे सरकार’ सत्तारूढ होण्यापासून कोणी रोखू शकले नाही असा टोला शिवसेनेने अमित शहा आणि नारायण राणेंना लगावला आहे.
तसेच अमित शहा यांच्यात व शिवसेनेच्या कार्यपद्धतीत एक साम्य आहे. शिवसेनासुद्धा जे करते तेसुद्धा ‘डंके की चोट’पर करते. तसे नसते तर काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर उघडपणे सत्ता स्थापन केली नसती. आम्ही लपूनछपून काळोखात काही करत नाही, असे कोकणात सांगितले गेले. त्यावर कोकणातली भुतेही हसून नाचली असतील. फडणवीस यांचा पहाटेच्या अंधारातला शपथविधी हा उघडपणाच्या आणि ‘डंके की चोट’च्या कोणत्या व्याख्येत बसतोय, पण ठीक आहे. धुरळा उडवायचा म्हटल्यावर या अशा उडवाउडवीकडे दुर्लक्ष करायला हवे. देशासमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत व देशाच्या गृहमंत्र्यांनी त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे लक्ष दिले पाहिजे असा टोला अमित शहांना लगावण्यात आला आहे.