हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिनाभरापासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील शाब्दिक युद्ध 2 दिवसांपूर्वीच मिटलं असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमधील वाद उफाळून आला आहे. राणा यांनी बच्चू कडू याना थेट घरात घुसून मारण्याची धमकी दिली आणि बच्चू कडू यांनीही त्यावर प्रतिक्रिया देत हिंमत असेल तर ये, मी घरीच आहे असं प्रतिआव्हान दिले. या एकूण सर्व घडामोडींवरून शिवसेनेच्या सामना अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. रवी राणा यांचा बोलविता धनी कोण याचा विचार बच्चू कडू यांनी करावा असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.
अमरावतीमधील दोन आमदार बच्चू कडू व रवी राणा यांच्यात एखादा तात्त्विक वाद राज्याच्या पिंवा लोकांच्या विकासासाठी घडला असता तर समजण्यासारखे होते. विदर्भातील मोठे उद्योग गुजरातमध्ये पळवून नेले व वैदर्भी जनतेचा लाखोंचा रोजगार बुडाला म्हणून या दोघात भांडण पेटले असते तरीही ते समजून घेता आले असते. विकासासाठी निधी कमी पडत आहे, ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत यावर दोन आमदारांनी शब्दांची ढाल तलवार चालवली असती तरी जनतेने त्याचे स्वागत केले असते व त्यांच्या तोंडून निघालेली चिखलफेक सहन केली असती, पण दोन आमदारांचे भांडण खोक्यावरून सुरू झाले व महाराष्ट्राने तमाशा पाहिला. बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते व गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतले असा हल्ला. आमदार राणा यांनी कडू यांच्या मतदारसंघात जाऊन केला. बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार असल्याचा दुसरा हल्ला राणा यांनी करताच कडू यांनीही हिसका दाखवला व राणांची पोलखोल केली.
रवी राणा हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमान भक्त आहेत. संकट आले व सत्य बोलायचे असेल तर ते हनुमान चालिसा वाचतात च बेभानपणे आरोपांची गदा फिरवितात. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल? राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल असं सामनातून म्हंटल आहे .
आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय ? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नाते जुळवायचे म्हटले तरी लोक मागे हटतील. काळाने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे कडूच असते. त्याला कोण काय करणार? असं म्हणत शिवसेनेनं या संपूर्ण प्रकरणावरून निशाणा साधला आहे.