हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘धर्म-देवळे- धार्मिक तणाव’ याच त्रिसूत्रीतून भाजप निवडणुकांना सामोरा जाईल. धर्म ही अफूची गोळी आहे. त्या अफूचा अंमल देशाच्या नसांत पुरेपूर भिनला आहे. 2024 हे धार्मिक वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेने त्याची सुरुवात होईल. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, महिलांना संरक्षण, प्रतिष्ठा देऊ न शकलेल्या सरकारने धर्माच्या नावाखाली अफूच्या गोळया दिल्या व त्याच नशेचा अंमल कायम राहावा म्हणून 13 हजार कोटी रुपये खर्च करून देशात 21 भव्य मंदिरांचे कॉरिडॉर उभारले जात आहेत. असं म्हणत सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
मंदिरांचा विकास केला हाच मोदींचा प्रचाराचा मुद्दा राहील. कारण तेच त्यांचे हिंदुत्व आहे. लोकांना घंटा बडवण्यात, पूजा- अभिषेक, महाआरत्यांत गुंतवून ठेवण्याची कला भाजपला साधली आहे व त्यासाठी बागेश्वर बाबा, मनोहरपंत भिडे, रामरहिम असे बाबा लोक त्यांनी हाताशी ठेवले आहेत. देशभरातील मंदिरांचा जीर्णोद्धार व्हावा, पुनर्निर्माण व्हावे याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. परकीय आक्रमणांत अनेक मंदिरांची हानी झाली आहे. अनेक पुरातन मंदिरांत डागडुजी वगैरेची गरज आहे. देशाबाहेर भव्य सुवर्ण मंदिर, मशिदी, चर्च वगैरे उत्तम वास्तुकलेचे नमुने आहेत. आपल्या मंदिरांतही अशी भव्यता, स्वच्छता, शिस्त व नीटनेटकेपणा असावा व त्यासाठी राज्यकर्त्यांनी पुढाकार घेतला तर चुकीचे नाही, पण फक्त मंदिरे उभारून देशाची प्रगती होत नाही. शिक्षण, उद्योग, विज्ञान, संरक्षण उत्पादन, कला, सामाजिक न्याय व सुधारणा यातही भारत देश अग्रेसर असावा असं ठाकरे गटाने म्हंटल आहे.
मंदिरे ही मनःशांतीसाठी आहेत. विज्ञान हे प्रगतीसाठी आहे. भारत सरकार 21 मंदिरांच्या विकासावर व धार्मिक कॉरिडॉरवर मोठय़ा प्रमाणात काम करीत आहे. त्यात विज्ञान नाही. सोमनाथ मंदिर, काशी विश्वनाथ, महाकाल मंदिरांचे कॉरिडॉर तयार झाले. पंतप्रधानांनी त्यांचे लोकार्पण केले. उत्तर प्रदेशात मथुरा-वृंदावन, अयोध्या, आसामात कामाख्या मंदिर, मध्य प्रदेशातील चित्रकुटात वनवासी रामपथ, ओरछा येथे रामराजा लोक, दतिया येथे पीतांबरा पीठ कॉरिडॉर, इंदूरला अहिल्या नगरी लोक, बिहारात भगवती स्थान, महिषी तारास्थानचे निर्माण कार्य सुरू झाले आहे. राजस्थानातदेखील गोविंददेव मंदिर, तीर्थराज पुष्करसाठी कोटयवधी रुपये खर्च केले जात आहेत. महाराष्ट्रातसुद्धा मंदिरांवर मोठे काम सुरू आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या कॉरिडॉरवर 250 कोटी, तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर कॉरिडॉरवर कोटयवधी खर्च होत आहेत. गुजरातमध्ये अद्भुत द्वारकानगरी उभारणीचे काम सुरू झाले असून त्यावर एक हजार कोटी रुपये खर्च होतील. 138 कोटी खर्च करून द्वारका बेट उभारले जात आहे. 2024 च्या निवडणुकांआधी ही सर्व मंदिरे तयार होतील. 2009 व 2014 साली सत्तेवर येण्याआधी मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली. देशात गोमांस, समान नागरी कायदा, लव्ह जिहाद, हनुमान चालिसा अशा विषयांवर धार्मिक तणाव निर्माण करायचे व त्या वातावरणाचा फायदा घेऊन निवडणुकांना सामोरे जायचे हे भाजपचे नित्याचेच धोरण. त्यात आता मंदिरांची भर पडली असं सामनातुन म्हंटल.
मणिपुरातील हिंसाचारात अनेक मंदिरांची हानी झाली. कश्मीर खोऱ्यात मंदिरे धोक्यात आहेत. त्यावर भारतीय जनता पक्षाचे बोलघेवडे मौन पाळून बसतात. मणिपुरात महिलेची नग्न धिंड काढली जातेय. शेकडो लहान मुले तेथील हिंसाचारात अनाथ झाली. त्यांचे रक्षण कोणते मंदिर, चर्च, मशीद करणार? शेवटी मानवता हाच श्रेष्ठ धर्म आहे व हिंदू धर्माची तीच खरी शिकवण आहे. केदारनाथला आलेला प्रलय मानवी जिवांचे रक्षण करू शकला नाही. तेथे आपण पर्यावरण, निसर्ग, विज्ञानाची पत्रास बाळगली नाही. अफूच्या गोळीने ना धर्माचे रक्षण होते, ना राष्ट्राचे संरक्षण होते. कोरोनाच्या संकटकाळात मंदिरे बंदच होती. डॉक्टर, परिचारिका हेच देवाच्या रूपात वावरत होते. थाळय़ा वाजवून, घंट कोरोना पळाला नाही. महाराष्ट्रात तो उद्धव ठाकरे यांच्या कार्यामुळे रोखला. गंगेत माणसांची प्रेते त्या काळात वाहताना जगाने पाहिली. तेथे धर्म होताच, पण विज्ञानाचा वापर झाला नाही व लोकांना गंगेत वाहत मरावे लागले. 2024 साली पुन्हा एकदा धर्मांध अफूचेच पीक काढण्याची तयारी सुरू आहे. 21 मंदिरांचा वापर त्यासाठी होईल. भक्तांनी आता सावध राहावे, इतकेच! असा इशारा सामनातून देण्यात आलाय