चंद्रपूर प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी ईव्हीएमविषयी भाष्य केले . माझ्या मनात ईव्हीएमविषयी शंका आहेच, परंतु मी ईव्हीएम संर्दभात बोलायला लागलो की ४० पैशाचे लावारिस भक्त लगेच फेसबुक आणि व्हॅाट्सअॅपवर मेसेज पाठवून ईव्हीएमविषयी तुम्हाला शंका आहे तर, तुम्ही कसे निवडून आलात असे प्रश्न विचारतात.
मात्र जर ईव्हीएम नसतं, तर शिरुरमधून एक शेतकऱ्याचा साधा पोरगा फक्त साठ हजारांच्या मताधिक्याने निवडून आला नसता असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मी राजीनामा देण्यास तयार असून आता ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास दोन-अडीच लाखांनी निवडून नाही आलो, तर माझं नाव बदला असं ओपन चॅलेंज अमोल कोल्हेंनी दिलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली असून ही यात्रा सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात पोहचली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच कोल्हे यांनी शिवसेनेच्या जनआर्शिवाद यात्रेवरही ताशेरे ओढले.