थर्ड अँगल | सुमित वाघमारे
साने गुरुजी यांच्याबाबत माझे वाचन कमी आहे. श्यामची आई लहान असताना वाचली. त्यातले बरेचसे आज पटत नाही. पण एक वाक्य आजही आठवते – पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस, तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम!
दुसरी आठवण डॉ. दाभोलकर यांच्या संदर्भाने आहे. मी अगदीच लहान असताना ( २-३ री इयत्ता असेल), डॉक्टरांना माढा कॉलेजला वडिलांनी व्याख्यानाला बोलावले होते. कदाचित इतर ठिकाणी देखील कार्यक्रम आयोजित केलेले असावेत. अशाच एका कार्यक्रमात शेवटचा प्रश्न म्हणून मला प्रश्न विचारायला मिळाला होता. (लहान असल्याचा फायदा!) मी काहीतरी माणूस कसा प्रगत झाला वगैरे सारखा काहीतरी प्रश्न विचारला असावा असे वाटते. कारण त्यावर उत्तर देताना डॉक्टरांनी ‘ मानवजातीची कथा ‘ हे पुस्तक वाचायला सांगितले होते. अंगठा हा सगळ्या बोटांवर टेकवता येणे, हेदेखील प्रगतीचे कारण असल्याचे सांगितले, असे आठवते. तर, वडिलांनी लगेच ते पुस्तक काही दिवसात आणून दिले होते. तेव्हा फारसे कळले नव्हते. नंतर मग ६ वी मध्ये पुन्हा एकदा वाचले. जरा जरा समजले. पण बारीक फॉन्ट मुळे फारसे नीट वाचले असेल असे वाटत नाही. नंतर मग १० वी नंतर केव्हातरी ते नीट वाचले. हे पुस्तक साने गुरुजी यांनी अनुवादित केलेले होते. डॉ. हेन्री थॉमस या मानववंशशास्त्रज्ञाचे हे पुस्तक. तर हा माझा साने गुरुजी यांच्याशी असलेला दुसरा संदर्भ.
लहानपणी मला गोष्टी वाचायची फार सवय होती. भा रा भागवतांचे फास्टर फेणे पुस्तक संच आजही मी तितक्याच आवडीने वाचू शकतो. जग विसरायला लावणाऱ्या काही कलाकृती असतात. त्या तुम्हाला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जातात, आणि त्या दुनियेत रमताना ताण-तणाव, चिंता या सगळ्या गोष्टी हलक्या होतात. असो. तर याच काळात साने गुरुजींच्या गोड गोष्टी अशा १० की १२ भागातील पुस्तकांचा देखील शोध लागला होता! या गोष्टी जादुई दुनियेत नेणाऱ्या नव्हत्या. पण माणूस म्हणून इतरांचा विचार करायला लावणाऱ्या होत्या. हा साने गुरुजी यांच्या कामाशी आलेला तिसरा सबंध.
आता या सगळ्या मनाच्या – मेंदूच्या खाद्याचे केंद्र मला मंचरला आल्यावर मिळाले. माढ्याला असताना पुस्तके कुठून यायची हे फारसे आठवतच नाही. कदाचित सोलापूरला गेल्यावर वडील आणत असावेत. किंवा, पोस्टाने मागवली जात असावीत. पण मंचरला आल्यावर मात्र पुणे हे पुस्तकांचे ठिकाण झाले. पुण्यात साधना मीडिया सेंटरला जाऊन स्वतः चाळून पुस्तके खरेदी करणे म्हणजे माझ्यासारख्या मुलासाठी एक भन्नाट अनुभव होता. असं स्वर्गप्राप्ती झाल्यासारखे वाटले होते! आता हे साधना मीडिया सेंटर म्हणजे साने गुरुजी यांनी सुरू केलेल्या साधना प्रकाशनाचे पुस्तकांचे दुकान आहे. पुस्तक आणि सीडी डीव्हीडी असा विभाग होता. मुलांच्या पुस्तकांचा एक वेगळा विभाग होता. मला वाटते अजूनही आहे. तिथले क्षण हे मला आजही हवेहवेसे वाटतात. (२०१५-२०१८ एवढं दीर्घकाळ पुण्यात राहून मी साधना मध्ये फक्त २-३ वेळाच कसा काय फिरकलो याचे आत्ता मला आश्चर्यच वाटते आहे. शिवाय डिप्रेशन तुम्हाला तुमच्या आयुष्यापासून, आनंदापासून किती दूर नेते याची पुन्हा एकदा जाणीव झाली!) तर असो. हा साने गुरुजी यांच्या कामासोबत आलेला चौथा संदर्भ.
या साधना प्रकाशनाची सुरुवात साने गुरुजी यांनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकातून झाली. हे साधना साप्ताहिक मंचर मध्ये असतानाचा माझ्या हाती लागले. पाचवी – सहावीच्या वयापासूनच साधनाचे अंक चाळायला लागलो होतो. हळू हळू वैचारिक जडण घडण व्हायला सुरुवात झाली होती. साधना साप्ताहिकातून सर्वात महत्वाची गोष्ट मला कोणती मिळाली असेल, तर ती म्हणजे मांडणी कशी करावी याची शिकवण! त्यातील लेखातून मला समजले की वैचारिक वाद, प्रतिवाद कसा करावा. पुढच्याचे मुद्दे समजून कसे घ्यावेत. आपले त्या मुद्द्यांबाबत असलेले आकलन पहिल्यांदा मांडून, मगच आपली मते व्यक्त करावी हे आपोआप समजू लागले. कोणी शिकवण्याची गरज भासली नाही. आणि नंतर जरा अधिक मोठे झाल्यावर आंबेडकरांची भाषणे वाचताना त्यात खूप मोठी भर पडत गेली. साताऱ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत असताना, ‘पारिजातक’ या वार्षिक अंकाचे विद्यार्थी संपादक म्हणून माझे आणि सोनमचे
Sonam Powar नाव वाडीकर मॅडमनी चिकटवले होते. त्याचा एक फायदा झाला तो म्हणजे डॉ हमीद दाभोलकर आणि विनोद शिरसाठ यांच्यासमोर वार्षिक अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात मनोगत व्यक्त करता आले. त्यावेळी मी म्हणालो होतो, की साधना साप्ताहिक हे माझे इनपुट आहे तर पारिजातक हे माझे आऊटपुट आहे. अगदी खरे होते ते. तर या साधना साप्ताहिकामुळे आलेला हा साने गुरुजी यांच्या कामासोबत आलेला माझा पाचवा संबंध.
हे सगळे लिहिण्याचा प्रपंच म्हणजे मी आत्ता The Story of Philosophy हे विल ड्यूरांट यांचे पुस्तक वाचतो आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. हे पुस्तक ५-६ वर्षापूर्वी माझ्या हाती पडायला हवे होते असे वाटून गेले. आणि हे पुस्तक मराठीत उपलब्ध असेल तर संग्रही हवे, आणि ओळखीतल्या लोकांपर्यंत हे पोचवायला हवे असे वाटले, म्हणून जरा तपास केला तर ते पुस्तक मराठीत आहे. आणि याचाही अनुवाद केलाय साने गुरुजी यांनी – पाश्चात्य तत्वज्ञानाची कहाणी या नावाने!! (पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास असेही एक मराठीत पुस्तक आहे. पण ते बर्ट्रांड रसेल यांच्या पुस्तकाचा अनुवाद आहे.)
आता ही पोस्ट लिहायला सुरुवात केली तेव्हा मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, की मी साने गुरुजी यांचे काम फारसे जाणत नाही पण त्यांनी काही महत्त्वाच्या पुस्तकांच्या अनुवादाचे काम किती चांगले करून ठेवले आहे,. पण लिहायला गेलो आणि झालं काहीतरी भलतंच! मीच अजून या धक्क्यातून सावरतो आहे की साने गुरुजी यांनी केलेल्या कामाचा एवढा मोठा प्रभाव माझ्यावर आहे. निश्चितपणे यासोबत आणखी कितीतरी व्यक्ती, विचार माझ्या जडणघडणीचा भाग आहेत, होत आहेत पण तरीही साने गुरुजी यांच्याबाबत मला फारशी माहिती नसताना सुद्धा त्यांच्या कामाचा फार मोठा परिणाम झालेला दिसतो आहे.
मला अजूनही साने गुरुजी यांच्याविषयी फार माहिती आहे असे वाटत नाही. जेवढे वाचले आहे त्यातील त्यांच्या कामाबाबत काही मतभेद देखील आहेत. पण मुद्दा हा, की आपण जे काम करतो ते महत्वाचे असते. ते पोहचत राहते. आणि अशी कामे करत असणाऱ्या लोकांना माझ्या या नोंदीमुळे काही आशा मिळाली तर उत्तम! कारण सध्याच्या द्वेषाच्या वातावरणात निराशा पसरत असताना Romanticism फार फार गरजेचा आहे.
साधनाचे चे ब्रीदवाक्य आहे, तेच घडावे हा हेतू या पोस्ट मागे :
स्थापण्या समता शांती, ठेवूनि शुद्ध साधनां,
जे करिती साधना
त्यांना ठेवो, उत्स्फूर्त साधना!
हे एवढेच नोंदवण्यासाठी ही पोस्ट. खूप Digression पण झाले आहे. पण जसे सुचेल तसे लिहिलंय. नोंदवावे वाटले.
सुमित वाघमारे – 9665598618 (लेखक सुगत अकॅडमीचे संचालक आहेत. विज्ञान समजून घेऊन ते शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याची धडपड ते करतायत.)