हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना महामारीचे संकट सुरु आहे. बहुतांश साऱ्याच देशांची अर्थव्यवस्था गंभीर झाली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही गंभीर झाली आहे. मात्र पाकिस्तानमधील आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे आर्थिक सल्लागार अब्दुल हाफिज शेख यांनी ही माहिती दिली आहे.
एका आर्थिक सर्वेक्षणानुसार २०१९ -२० मध्ये पाकिस्तानमध्ये १ लाख गाढवांची वाढ झाली आहे. या वाढलेल्या संख्येनुसार पाकिस्तानातील गाढवांची संख्या ५५ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. चीनने आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार पाकिस्तान चीनला दरवर्षी ८० हजार गाढवांची रवानगी करण्यात आली आहे. चीनमध्ये गाढवांचा वापर मांसासाठी तसेच अन्य बाबींसाठी केला जातो. गाढवांच्या कातडीपासून मिळालेल्या जिलेटीनपासून चीनमध्ये विविध प्रकारची औषधे तयार केली जातात तसेच गाढवांची कातडीही वापरली जाते.
चीनच्या काही कंपन्यांनी पाकिस्तानातील गाढवांच्या व्यापारात लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. गाढवांची संख्या अधिक असलेला पाकिस्तान जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. गाढवांच्या प्रकारानुसार त्यांचे दर निश्चित केले जातात. काही अहवालांनुसार, पाकिस्तानात एका गाढवाच्या कातडीसाठी १५ ते २० हजार रूपये आकारले जातात. याची विक्री करून पाकिस्तान मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहे. तर दुसरीकडे गाढवांच्या उपचारांसाठी पाकिस्तानात विशेष रुग्णालयंदेखील आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.