सोलापूर | भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर शहरातील मड्डीवस्ती परिसरात दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसले तरी वाहनाचे मात्र नुकसान झाले आहे. याप्रकारामुळे शहर आणि जिल्ह्यातील राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दगडफेकीचा प्रकार झाला आहे.
ओबीसींच्या आरक्षण प्रश्नावर विविध सामाजिक संघटना तसेच ओबीसी प्रवर्गातील लोकांशी चर्चा करण्यासाठी पडळकर बुधवारी सोलापुर दौ-यावर आले होते. सकाळपासूनच त्यांनी घोंगडी बैठकांचा सपाटा लावला होता. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार शरद पवार आणि त्यांच्या घराण्यावर जहरी टिका केली होती.
बुधवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. त्यामध्ये त्यांच्या वाहनाचे समोरील काचेचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसांत अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. तसेच आ. गोपीचंद पडळकर सुरक्षित आहेत.