हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं प्रत्येक विधान अगदी बारकाईने बघावं लागते… पवार कधी काय बोलतील? त्याचा अर्थ काय निघतो याचा थांगपत्ता मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांना सुद्धा लागत नाही. आताही शरद पवारांनी असच एक मोठं विधान करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं भाकीत पवारांनी वर्तवलं आहे. काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय प्रादेशिक पक्षांना सर्वोत्तम आहे असं पवारांनी म्हंटल. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शरद पवारांनी हा राजकीय बॉम्ब टाकला आहे.
शरद पवार म्हणाले, 2024 च्या निवडणुकीनंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होऊ शकतो का? असा उलट सवाल केला असता काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. .परंतु त्यावर आत्ताच काही बोलणं योग्य नाही . सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही, याबाबतचा कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल असं म्हणत शरद पवारांनी चर्चाना उधाण आणलं आहे. महत्वाचे म्हणजे काही महिन्यापूर्वीच शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या, मात्र त्यावेळी त्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या.
शरद पवारांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत सुद्धा भाष्य केलं. उद्धव (ठाकरे) देखील (समविचारी पक्षांसोबत) एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. “मी त्याची विचारसरणी पाहिली आहे… ती आमच्यासारखीच आहे असं शरद पवारांनी म्हंटल. पवारांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरेंची अडचण होण्याची शक्यता आहे, कारण भाजप आधीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचत असते, त्यातच आता पवारांनी ठाकरेंचे आणि आमचे विचार एकसारखं असल्याचे बोलल्याने ठाकरेंची राजकीय अडचण होण्याची शक्यता आहे.