आईला मारहाण केल्याचा जाब विचारत मुलाकडून वडिलांचा खून

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – आष्टी याठिकाणी मागच्या आठवड्यात आईला दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या वडिलांची गोळी घालून हत्या केल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी असताना अशीच एक घटना बीड जिल्ह्यातील पिंपळनेर या ठिकाणी घडली आहे. यामध्ये दारू पिऊन आईला शिवीगाळ आणि मारहाण केल्यामुळे मुलाने धारदार कोयत्याने वार करत वडिलांची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण
मृत व्यक्तीचे नाव श्रीकिसन अंबादास तागड असे आहे. ते बीड तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणी राहत होते. तसेच श्रीकिसन अंबादास तागड यांना दारूचे व्यसन होते. मागच्या काही वर्षांपासून ते व्यसनाच्या आहारी गेले होते. दारू पिऊन घरी आल्यानंतर ते सतत आईला शिवीगाळ आणि मारहाण करत होते. सोमवारी सायंकाळीसुद्धा श्रीकिसन यांचा आपल्या बायकोसोबत वाद झाला होता. आईला होणारी शिवीगाळ आणि मारहाण पाहून आरोपी मुलगा लहू दोघांच्या भांडणामध्ये पडला. यानंतर या बापलेकांमध्ये भांडण झाले. या वादानंतर वडील श्रीकिसन शेतात निघून गेले. बराच काळ झाला तरी ते शेतातून परत आले नाहीत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी लहूही शेतात गेला. त्यानंतर त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी मुलगा लहू याचा राग अनावर झाल्याने त्याने हातातील कोयत्यानं वडिलांवर सपासप वार करत त्यांचा खून केला.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षत शरद भुतेकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत श्रीकिसन यांचे भाऊ रोहिदास तागड यांच्या तक्रारीवरून मुलगा लहुविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा लहुला अटक करून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.