हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडू सध्या भारत जोडो यात्रा काढली जात आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. ही पदयात्रा शेगावमध्ये पोहचल्यावर तिथे मोठी ऐतिहासिक सभा होणार आहे. या सभेसाठी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी या महाराष्ट्रात येणार असून त्या सभेला उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शुक्रवारी (ता.18) रोजी शेगावमध्ये येत असून त्यांची राज्यातील दुसरी जाहीर सभा होणार आहे. सभेला चार ते पाच लाख जनसमुदाय उपस्थित राहील, असे नियोजन केले जात आहे. यादृष्टीने तयारीसाठी राज्यातील काँग्रेसचे बडे नेते येथे तळ ठोकून आहेत. शुक्रवारी दुपारी 4 वाजता ही सभा होणार आहे. यासाठी शेगाव-बाळापूर मार्गावर सुमारे 25 एकरांवर सभेसाठी व्यवस्था केली जात आहे.
शेगावमध्ये राहुल गांधींचा असणार मुक्काम
राहुल गांधी शेगावमध्ये मुक्काम करणार आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान जिल्ह्यातील वरखेड फाट्यावर वारकरी संप्रदायातर्फे गोल रिंगण केले जात आहे. यात राहुल गांधी हे सुद्धा सहभागी होऊन पावली खेळतील. तसेच संत गजानन महाराज संस्थानमध्ये जात ते ‘श्रीं’च्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. सभेच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही यानिमित्ताने आयोजित केले जाणार आहेत.