हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिवाळी अधिवेशन भरण्यापूर्वीच मोदी सरकारने येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. त्यामुळे या विशेष अधिवेशनात केंद्र सरकार कोणत्या घोषणा करेल याबाबत विरोधकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, विशेष अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या बाजूने 9 मागण्या मांडल्या आहेत. तर, विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर न केल्याबद्दल सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
सोनिया गांधींनी उपस्थित केलेले 9 मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात सोनिया गांधी यांनी नऊ महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. या मुद्द्यांमध्ये आर्थिक स्थिती, महागाई, बेरोजगारी, संघीय संरचना, राज्य सरकारांवरील हल्ले, अशा मुद्द्यांचा समावेश आहे. तसेच, सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी आश्वासने, अदानी प्रकरणाची जेपीसी, जात जनगणना करण्याचे आवाहन असे देखील मुद्दे या पत्राद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर, हिमाचल प्रदेशातील आपत्ती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा अशी मागणी सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना केली आहे. यावर न थांबता, देशातील सांप्रदायिक तणाव, मणिपूरमधील हिंसाचार तसेच लडाखमध्ये चीनची घुसखोरी असे महत्त्वाचे मुद्दे इंदिरा गांधी यांनी आपल्या पत्रात मांडले आहेत.
सोनिया गांधी यांनी मांडलेल्या या मुद्द्यांवर आता नरेंद्र मोदी काय भूमिका घेतील आणि काय प्रत्युत्तर देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता सोनिया गांधी यांनी हे मुद्दे उपस्थित केल्यामुळे विशेष अधिवेशनात त्यांची दखल घेतली जाईल का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान केंद्र सरकारकडून विशेष अधिवेशन घेतले जात असले तरी या अधिवेशनाचे मुख्य कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन महत्त्वाचे ठरेल असे म्हटले जात आहे.