विशेष प्रतिनिधी । महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. एकीकडे भाजप – शिवसेनेला त्यांची सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर दुसरीकडे ‘आघाडी’साठी ही निवडणूक त्यांचं राजकारणातील भविष्य ठरवणारी आहे. मात्र, असं असलं तरी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून दूरच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकांकडे सोनिया गांधींनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये येत्या २१ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर १९ ऑक्टोबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. शनिवारी १९ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. तरीही काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अजूनही महाराष्ट्रात एकही सभा घेतलेली नाही. इतकंच नाही, तर प्रियांका गांधी यांनीही महाराष्ट्रातील प्रचाराकडे पाठ फिरवली आहे.
दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडे राज्यात प्रचार सभा आणि रोड शोची मागणीही केली. मात्र, अद्याप ही मागणी अमान्य आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या प्रचाराची सर्व जबाबदारी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची समजली जाते. त्यामुळेच भाजपचे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीत जातीने लक्ष देत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या, गृहमंत्री अमित शाह यांनीही अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मात्र, काँग्रेसचे बडे नेते या निवडणुकीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.