आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेसवाल्यांना पगारावर उचललंय- निलेश राणे

मुंबई । बॉलिवूडमधील ड्रग रॅकेटशी संबंधाची चर्चा असलेल्या व सुशांत प्रकरणात नाव जोडल्या गेलेल्या संदीप सिंहच्या भाजपशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसवर माजी खासदार नीलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘सुशांतसिंहच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी काही काँग्रेसवाल्यांना शिवसेनेने पगारावर ठेवले आहे अशा बोचऱ्या शब्दांत निलेश राणे यांनी टीका केली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काल याच प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली व संदीप सिंह-भाजप व ड्रग कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी केली. अनिल देशमुख यांनीही त्यास प्रतिसाद देत काँग्रेसची ही मागणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असं स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी ट्वीटवर काँग्रेसवर तोफ डागली आहे. ‘सुशांतसिंहच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी काही काँग्रेसवाल्यांना शिवसेनेने पगारावर ठेवले आहे. रोज उठून काँग्रेसवाले संदीप सिंह आणि भाजपचं कनेक्शन शोधतायत. मीडियावाले सुद्धा दिशा सालियन आणि सुशांत प्रकरणातले खरे आरोपी शोधायचं विसरून फालतू प्रकरणात गुंतले आहेत,’ असं निलेश यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, चित्रपट निर्माता असलेला संदीप सिंह हा बॉलिवूडमधील ड्रग रॅकेटशी संबंधित असल्याची चर्चा आहे. संदीपची सुशांतशी चांगली मैत्री होती. सुशांत प्रकरणात ड्रगचा अँगल पुढं आल्यानं संदीपचं नावही या प्रकरणात जोडलं गेलं आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या संदीपचे भाजपच्या नेते मंडळींशी मैत्रीचे संबंध आहेत. संदीप मागील वर्षी ठराविक कालावधीत महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात तब्बल ५३ वेळ कॉल केले होते, असा आरोपही काँग्रेसनं केला आहे. भाजप कार्यालयातून संदीप सिंहशी कोण बोलायचा? त्याचा भाजपमधील हँडलर कोण आहे?, असे प्रश्न काँग्रेस सातत्यानं उपस्थित करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like