सांगली । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली एम, कर्नाळ, बोरगी याठिकाणी छापे टाकून हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले. यामध्ये १८६ लिटर हातभट्टी तसेच ६ हजार २२५ लिटर रसायन असा एकूण १ लाख ११ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने तीन ठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. तसेच वेळेवर आस्थापने बंद करण्यासाठी पथके तैनात केली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी दिली.
तसेच ३१ डिसेंबर रोजी देशी दारूचे २१ हजार आणि विदेशी दारूचे ३३ हजार परवाने काढले असल्याचेही त्यांनी सांगितले. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी तसेच तळीरामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. डफळापूर, म्हैसाळ आणि कोत्याबोबलाद याठिकाणी अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी तपासणी नाके लावून पाच पथके तैनात केली होती.
मद्य विक्रीची आस्थापने, हॉटेल, बार, रेस्टोरंट वेळेवर बंद होतील तसेच जिल्ह्यातील अवैध पार्ट्यांवर या पथकांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील कोरोली एम, कर्नाळ, बोरगी आणि आसपासच्या परीसरात अवैध धंद्यांवर छापे टाकून हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले. यामध्ये १८६ लिटर हातभट्टी तसेच ६ हजार २२५ लिटर रसायन असा एकूण १ लाख ११ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ३१ डिसेंबर रोजी देशी दारूचे २१ हजार आणि विदेशी दारूचे ३३ हजार परवाने तळीरामांनी काढले आहेत. या तळीरामांनी परवाने काढले नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत होती.