हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रात सध्या ६० हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खासगी कार्यालये पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळं वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या परप्रांतीयांनी आपापल्या राज्यांत माघारी जाण्यास सुरुवात केली. चाकरमानीही गावाकडे निघाले. त्यामुळे गेले चार दिवस कमी गर्दी असलेल्या मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांसाठी रांगा लागल्याचे दिसून आले. त्यामुळं केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी अधिक रेल्वेगाड्या देण्याची गरज असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं.
मुंबई-पुणे यासारख्या शहरात इतर शहरं आणि राज्यांमधून कामाला येणारी लोकं, करोनामुळे आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. परिणामी लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी रेल्वे स्थानकावर रात्री पर्यंत गर्दी होताना दिसत आहे. या गर्दीमुळे कोरानाची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवायचा असल्यास, केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी अधिक रेल्वे गाड्या देण्याची गरज आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी यासंदर्भात बोलणं सुरु असून लवकरात लवकर महाराष्ट्रात नवीन रेल्वे गाड्या मिळतील असा विश्वास आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.