हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी कामगारांच्याकडून विलीनीकरणाच्या मागणीसाठी अजून संप केला जात आहे. यावरून संपकरी एसटी कामगारांवर राज्य सरकारकडून बडतर्फीची कारवाई केली जात आहे. आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी पुन्हा संपकरी एसटी कामगारांना इशारा दिला. “एसटी कामगारांनी संप करत विलीनीकरणाचा मुद्दा आणखी ताणून धरू नये. त्यांनी कामावर परत हजर राहावे. अजूनही कामावर हजर झाला नाही तर कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा परब यांनी दिला आहे.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एसटी कामगारांवर संपामुळे आता मोठ्या प्रमाणात बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. ही कारवाई सुरू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यात संपामुळे दोन महिने पगार नाही मिळाला तर त्याचेही नुकसान होईल. हि गोष्ट संपकरी कामगारांनी समजून घ्यावी.
आम्ही आतापर्यंत एसटी कामगारांच्या हिताचा विचार करत त्यांना 41 टक्के पगार वाढ दिली आहे. तरी सुद्धा कामगारांकडून केवळ विलीनीकरण या एका शब्दावर आडून बसत संप केला जात आहे. आता प्रत्यक्षरितीने बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. आता एसटी विरोधातील कारवाई तीव्र करावी लागेल. एसटी ही अत्यावश्यक सेवेत आहे. त्यामुळे संप न करता कामगारांनी तत्काळ कामावर हजर होऊन काम सुरु करावे, असेही परब यावेळी म्हणाले.