सोलापूर प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मंगळवेढा येथील बांधकाम व्यवसायिक समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाच ऐन वेळी पंढरपुरातुन माजी आमदार सुधाकर परिचारक यांना रयत क्रांती संघटनेतून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे नाराज झालेले आवताडे सध्या बंडखोरीच्या तयारीमध्ये असल्याची जोरदार चर्चा सध्या मतदार संघात सुरू आहे. ‘पंढरपूर विधानसभा मतदार’ संघावर आज पर्यंत काॅग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व राहिले आहे.
2014 साली झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वर्चस्वाला आवताडे यांनी शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आवताडेंनी आमदार भारत भालके आणि प्रशांत परिचारक यांना आव्हान देत तब्बल 40 हजाराहून अधिक मते मिळवत शिवसेनेची ताकद दाखवून दिली होती. आवताडे यांना ‘भाजपा’कडून उमेदवारी मिळेल असे गृहीत धरले जात होते. त्यांनी यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूकीची तयारी देखील सुरू केली होती. मात्र ऐन वेळी भाजपने मित्रपक्षाकरवी विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांचे काका आणि माजी आमदार सुधाकर परिचारक यांना उमेदवारी दिल्याने आवताडे समर्थकातून नाराजी व्यक्त केली जात आहे.