हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभेच्या हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यातील कलगीतुऱ्यात अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा विषय निघाला आणि पुन्हा एकदा वातावरण तापलं. यानंतर अजितदादांच्या हातून एकदा चूक झाली असेल म्हणून तुम्ही वारंवार त्यांच्यासंदर्भात असं बोलणार का? असा चिमटा मुनगंटीवार यांनी नवाब मलिक यांना लगावला
सभागृहात नेमकं काय घडलं
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी यावेळी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा मांडला .त्याला राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर देत म्हंटल की, मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला आहे. पण प्रकरण हायकोर्टात गेलं आहे. कोर्ट जे सांगेल त्याची आम्ही अंमलबजावणी करू असं सांगतानाच 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही. केंद्राने जर मर्यादा वाढवली तर आरक्षण वाढवून देता येईल.
मलिक यांच्या उत्तरानंतर सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि त्यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. अल्पसंख्याक मंत्र्यांना आरक्षण देता आलं असतं तर त्यांनी रात्रीच फाईल काढली असती, असं मुनगंटीवार म्हणाले. त्यावर आम्ही रात्रीचे उद्योग करत नाही, असं मलिक म्हणाले. त्यानंतर , तुम्ही अजित पवारांबद्दल बोलतात का? तुम्ही अजित पवारांचे विरोधक आहात का? झाली एकदा अजितदादाकडून चूक, असा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला .