सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून जबरी चोरी, विनयभंग, अपहरण आणि धमकी देण्याचे काम काही टोळ्यांकडून केले जात आहे. यातील काही गुन्हे दाखल असलेल्या दोन टोळी प्रमुखांवर सातारा जिल्हा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. संबंधित दोन जणांना दोन वर्षांकरिता सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार संजय सायबु पवार (वय 22) रा. नामदेववाडी, झोपडपट्टी, सातारा. व आशुतोष सयाजीराव भोसले (वय 23) रा. कृष्णविहार सोसायटी, शाहुनगर गोडोली सातारा अशी तडीवर केमेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरात एका टोळीतील संजय पवार व आशुतोष भोसले या दोघांवर जबरी चोरी, विनयभंग, अपहरण असे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना तडीपार करण्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बी. बी. निंबाळकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अन्वये प्रस्ताव सादर केला होता. यावरून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महत्वाचे आदेश दिले.
प्रतिबंधक कारवाई करुनही संबंधित टोळीच्या संशयीत हालचालीस सुरु होत्या. त्यांच्या कृत्यांमुळे सर्व सामान्य नागरिकांचे आर्थिक व शारिरीक नुकसान झाले आहे. संबंधित गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याने त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. लोकांमधून संबंधित टोळीतील गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. म्हणून सातारा शहरातील एका टोळीतील दोघांजणांबाबत तडीपारीचा आदेश काढण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद सावंत, पो. काँ. केतन शिंदे पो. काँ. अनुराधा सणस, यांनी योग्य पुरावे सादर केले.