हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यापासून राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. अशातच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये देखील तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदार संघातून विरोधक म्हणून कोण उभ राहिल याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. मुख्य म्हणजे, अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे आता बारामतीच्या लोकसभा मतदारसंघातून नणंद विरूद्ध भावजय उभी राहील अशी देखील चर्चा रंगली आहे. या सर्व चर्चांवर आता संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कुणीही निवडणूक लढवली तरी..
सध्या राजकिय वर्तुळात, भाजपला टक्कर देण्यासाठी बारामतीतून सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या तर त्यांना विरोधक म्हणून सुनेत्रा पवार उभ्या राहतील अशी चर्चा रंगली आहे. या सर्व चर्चांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “मला वाटत नाही, असा सामना बारामतीत होईल म्हणून… या सगळ्या अफवा सुरू आहेत. राजकारण आम्हाला सुद्धा कळतं. आम्ही सुद्धा राज्य केलं आहे आणि आम्हाला पवार कुटुंब सुद्धा माहित आहे. बारामतीचं राजकारण सुद्धा माहिती आहे. कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार आहेत”
मुख्यमंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यावर प्रतिक्रिया
यानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेशी दौऱ्यावर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “हा दौरा आदित्य ठाकरे यांच्यामुळे रद्द झाला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती आहे. हे आधी कळलं नव्हतं का तुम्हाला? मुख्यमंत्री अचानक घाईघाईने परदेश दौऱ्यावर निघाले होते. कुठे चालले होते माहित नाही. महाराष्ट्रात ते गुंतवणूक आणणार होते. त्यापूर्वी मुंबईला पुन्हा वैभव मिळवून द्या. तुम्ही तिकडे जाऊन काय मिळणार? उलट सरकारी पैशाचा अपव्यय होणार. नागपूर बुडालं. महाराष्ट्रात दुष्काळ आहे. हे तुम्हाला आदित्य ठाकरे यांच्यानंतर कळालं का?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, सध्या राज्यात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादीत पडले आहेत. या दोन्ही गटांमध्ये राष्ट्रवादीवर हक्क गाजवण्यासाठी वादविवाद सुरू आहेत. मुख्य म्हणजे अशा काळातच आगामी निवडणुकांचे देखील बिगुल वाजत आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी एकमेकांना टक्कर देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. एकीकडे शरद पवार महाराष्ट्रात दौरे घेत असताना दुसरीकडे अजित पवार यांच्या सभा सुरू आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये या दोन्ही गटांची लढत पाहायला मिळेल हे निश्चित आहे.