हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा ट्विटद्वारे दावा केल्याने खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोहित कंबोज यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, कंबोज यांच्या ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून याबाबत मी बोलण्यापेक्षा ज्यांनी ट्वीट केले, त्यांनाच जाऊन विचारावे लागेल, असे त्यांनी म्हंटले.
कंबोज यांच्या ट्वीटनंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. यावर खा. सुळे यांनी आज पुण्यातील पौड येथे माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, “सिंचन घोटाळ्याचा विषय आता संपला आहे. मात्र, हा विषय पुन्हा का काढला जातो आहे. याबाबत मला बोलता येणार नाही. ज्यांनी ट्वीट केले, त्यांनाच जाऊन विचारावे लागेल. कंबोज यांच्या ट्विटची अमित शाह यांनी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली.
Save This Tweet :-
One NCP Big – Big Leader Will Meet Nawab Malik & Anil Deshmukh Soon !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 16, 2022
मोहित कंबोज यांनी यांचे ट्विट काय?
मोहित कंबोज यांनी मंगळवारी काही ट्वीट केले. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असा दावा ट्विटद्वारे केला. तसेच आणखी एक ट्वीट करत कंबोज यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. २०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी ट्वीटद्वारे केली आहे.