हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केल्यानंतर आता सुरेखा पुणेकर यांनी दरेकरांना जशास तसे उत्तर देत खडेबोल सुनावलं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नाही तर महिलांचा आदर करणारा पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सुरेखा पुणेकर म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नाही तर महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. प्रवीण दरेकरांना महिलांचा सन्मान करता येत नसेल तर करु नका. मात्र महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? असा सवाल सुरेखा पुणेकर यांनी विचारला आहे. प्रवीण दरेकरांनी माफी मागावी, त्याशिवाय महिला शांत बसणार नाहीत, असा इशाराही सुरेखा पुणेकर यांनी दिला आहे.
दरेकर नेमकं काय म्हणाले होते-
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केली होती.