हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, नुकसान भरपाई आणि एफआरपीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. साखरेला चांगले भाव आले आहेत. अशा परिस्थितीत एफआरपीचे तुकडे करण्याचे कारस्थान रचले जात आहे. महाविकास आघाडीने पूरग्रस्त, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवले आहे. सरकारमध्ये राहायचे की नाही याचा विचार करावा लागेल, असेही शेट्टी यांनी म्हंटले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20 वी ऊस परिषद पार पडली. या ऊसपरिषदेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर आरोप केले. यावेळी शेट्टी म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार पावसात भिजत-भिजत आले. त्यामुळे या सरकारमधील जाणकारांना महापुराची जाण असेल असे वाटले होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, माझ्यावर विश्वास ठेवा, मी फसवणार नाही. सरकारने काय मदत केली हे गेल्या काही दिवसांत सर्वांनी पाहिले आहे.
स्वामिनाथन आयोग लागू करतो म्हणून सत्तेवर आलेल्या भाजपने कृषी मूल्य आयोगाची वाट लावली. भाडोत्री आणि विकाऊ लोक दिल्लीत बसले तर शेतकऱ्यांची वाट लागायला वेळ लागत नाही, अशीही टीका यावेळी राजू शेट्टी यांनी केली. एकरकमी एफआरपी दिली तर साखर कारखानदारीची अवस्था मुंबईतील गिरणीसारखी होईल, असे पवार म्हणत आहेत. पण एकरकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर मंत्री असताना तुम्हीच सह्या केल्या होत्या हे लक्षात आणून देतो. महाराष्ट्राने काकावर विश्वास ठेवावा की पुतण्यावर? असा सवालही शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला.