जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे.तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनी दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी ॲग्रो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन सुरू झाले आहे.
जालना जिल्ह्यातील अकरा हजार आठशे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी एचडीएफसी ॲग्रो कंपनीकडे फळपीक विमा भरला होता.या मोसंबी फळपिकाचा ३८ कोटी २१ लाख ८६ हजार रुपये मंजूर झाले आहे. मात्र अद्याप ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाहीत.त्यामुळे जोपर्यंत विमा मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह या कंपनी कार्यालयात मुक्काम आंदोलन छेडले आहे.
“मोसंबी विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा”, “एचडीएफसी ॲग्रो कंपनीचे करायचे काय,खाली डोकं वर पाय”, “जय जवान जय किसान”, आदी घोषणांनी कंपनी कार्यालय दणाणून गेले होते यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,सचिव पांडुरंग गटकळ, युवानेते विष्णू नाझरकर, जेष्ठ नेते बाबासाहेब दखणे,अंकुश तारख,संतोष शास्त्री जैन,सचिन चोरमले,बंडू शिंगटे,रामभाऊ कोळेकर,धर्मराज अनपट,नामदेव बरबडे, सतीश उंडे,धनंजय गोरे,अमोल शिंदे,अनिल सावंत आदींसह शेतकरी उपस्थित होते. एचडीएफसीॲग्रो विमा कंपनी करून आंदोलकांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याने आंदोलन सुरूच होते.