हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. त्यावेळी जलील यांनी आम्ही महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतोय, असे सांगितले. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “सध्या एका ‘एमआयएम’ या कट्टरतावादी पक्षाला तुम्ही हवे हवेसे वाटता, तर उद्या तुम्ही ‘आयसीस’ला ही आवडणार. आता ‘आयसीस’ बरोबर चर्चा करण्याचेच राहिले आहे. उद्या उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत बोलतील की आम्ही ‘आयसीस’ बरोबर चर्चा करायला अफगाणिस्तानला चाललोय, अशी टीका राणे यांनी केली.
नितेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘एमआयएम’ हा कट्टरतावादी पक्ष आहे. टोकाची भूमिका घेतो. ज्या पद्धतीने शिवसेना अजानची स्पर्धा घेते. टिपू सुलतानच्या नावाचा गवगवा करते. एकंदरीत हिंदुत्वाची चादर बाजूला टाकून शिवसेना स्वतःला सेक्युलर म्हणवून घेण्याचे काम करते आहे.
वाह.. AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी..
कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे..
आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे..
खरंच, करून दाखवलं!!— nitesh rane (@NiteshNRane) March 19, 2022
नितेश राणे यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “दाऊद बरोबर फिरणारे, अंडरवर्ल्ड-अतिरेकी यांच्याबरोबर सौदा करणारे हे लोक शिवसेनेला आणि संजय राऊतांना चालतात? मुळामध्ये संजय राऊत हे शिवसेनेचे नेते नाहीत, तर ते ‘राष्ट्रवादी’चे एजंट आहेत, अशी टीका राणे यांनी केली.