राज्यात विविध ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड, अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी देखील आल्या आहेत. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला.

नांदेडमध्ये मतदानाला पावसाचा फटका, मतदान केंद्रावर गर्दीच नाही

नांदेडमध्ये आज सकाळपासून पाऊस पडतो आहे. रिमझिम पावसात मतदान प्रक्रिया सुरु आहे. मात्र मतदान केंद्रावर मतदारांची म्हणावी अशी गर्दी दिसत नाही. सकाळच्या पहिल्या सत्रात पावसामुळ मतदारांचा अल्प प्रतिसाद आहे. त्यामुळं पावसाचा मतदानावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. एखाद दोन मतदार येऊन मतदान करताना दिसतायेत. जिल्हातील एकूण ९ मतदार संघात २९५५ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. इथं एकूण ३२७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या भवितव्याचा फैसला आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात मतदान संथगतीने; दुपारपर्यंत केवळ ३३.१२ टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ३३.१२ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली.

‘शंभरी’ पार केलेल्या आजीने बजावला तिसऱ्या पिढी सोबत मतदानाचा हक्क

नाशिकच्या गवळाने गावात राहणाऱ्या १०२ वर्षांच्या सखुबाई नामदेव चुंबळे मात्र प्रत्येक निवडणुकीत आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन जात मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपल्या तीन पिढ्यांना बरोबर नेत आज देखील मतदान केलं. आणि तरुणांसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या करून दिला.

मतदारांनो ‘या’ मुलीचा आदर्श घ्या…!

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सुट्टी असल्याने अनेक जण मतदान करण्याऐवजी घरीच आराम करण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याच बेत आखतात. मात्र मतदान आपलं कर्तव्य आहे, याचा अनेकांना विसर पडतो. मात्र समाजात अशीही काही मंडळी आहेत, ज्यांना कठीण परिस्थितीतही आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. दिंडोरी विधानसभा निवडणुकीत पेठ शहरातील खातून मुस्ताक शेख ही दोन्हीही पायानं अपंग आहे. तरीही या मुलीनं आज मतदानाचा आपला हक्क बजावला.

रवी राणांनी सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार

अमरावती जिल्ह्यात मतदानाचा जोर चांगलाच दिसून येत आहे. अपक्ष राहूनही आपण निवडून येऊ शकतो असा दांडगा आत्मविश्वास सोबत असलेल्या राणा परिवाराने आज मतदानाचा अधिकार बजावला. विद्यमान आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांनी आज सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली.

७२ वर्षांचा ‘सदाबहार’ मतदार करतोय गळ्यात फ्लेक्स घालून मतदानाचं आवाहन

आज राज्यभर लोकशाहीचा जागर सुरु आहे. विधानसभेच्या जागांवर राज्यातील मतदार आपला कौल मतदानाच्या माध्यमातून नोंदवत आहे. या सर्वात सोलापूर मध्ये एक निराळं चित्र पाहायला मिळालं. नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकट करण्यासाठी एक ७२ वर्षीय सदाबहार मतदार मात्र पायाला भिंगरी लावून मतदान जनजागृती करतं आहे.

‘बुलेट चं उत्तर बॅलेट ने देऊया!’ – जिल्हाधिकारी गडचिरोली

नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून सर्वांना परिचित असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क वाजवला आहे. जर आपल्याला गडचिरोली जिल्हा नक्षल मुक्त करायचा असेल तर मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या “बुलेट चे उत्तर बॅलेट ने देऊया! चला मतदान करूया!” असे आवाहन सिंह यांनी केलं आहे.  

सोलापूर मधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदान व्यवस्थित पार पडत आहे, तसेच नागरिकही मोठ्या उत्साहात मतदानाला जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु सोलापूर मधील सूतगिरणी परिसरात राहणाऱ्या सुमारे १ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधीना मतदान करूनही आपल्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत म्हणून हे पाऊल उचललं असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

‘मतदान करा, भरघोस सूट मिळवा’ !! त्वरा करा!

मतदारांनी मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून लढवल्या जातात. नागपूर प्रशासनान विधानसभेसाठी असाच एक अभिनव उपक्रम केला आहे. मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या परिक्षेत्रातील रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये भरघोष सूट मिळवा. अशी युक्ती लढवली आहे.