“ताईसाहेब…आम्ही लढण्यास तयार आहोत”, धनंजय मुंडेंच पंकजा मुडेंना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि लसींचा तुटवडा निर्माण झाल्याकडे लक्ष वेधलं आहे. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांच्या या पत्रावरुन धनंजय मुंडे यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे.

“ताईसाहेब, मुख्यमंत्र्यांना व आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल,” असा टोला धनंजय मुंडे यांनी ट्विट करत लगावला आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी जिल्ह्यातील लसीकरणाची माहिती देताना सांगितलं की, “जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून १४९४७३ नागरीकांना पहिले तर १९७३२ नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको”.

“जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे ६८०० व कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत,’ असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

“बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो,” अशी उपहासात्मक टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

 

“अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

“बीड जिल्ह्यात सध्या करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात ७२९ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ३४ हजार ९८९ असली, तरी त्यातील ३० हजार ४७८ रुग्ण बरे झाले आहेत. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. तर दुसरीकडे करोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

“आपणास विनंती आहे की, आपण यात जातीने लक्ष घालावे आणि रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे. महाराष्ट्र राज्य सरकारला आलेल्या २ लाख लसींपैकी बीडला राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ २० लसी मिळाल्या आहेत. ही अतिशय खेदजनक बाब आहे. तथापि याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून पुरेसे Vaccine उपलब्ध करुन द्यावेत आणि तशी व्यवस्था आपण करावी आणि संबंधित यंत्रणेला सूचित करावे,” अशी मागणी पंकजा मुंडे यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Comment