व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

चार पानी सुसाईड नोट लिहून तलाठ्याने केली आत्महत्या

औरंगाबाद – तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात कार्यरत एका तलाठ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. लक्ष्मण नामदेव बोराटे (४०, रा. कोळेकर गल्ली, सातारा परिसर) असे गळफास घेतलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या घटनेने सध्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद तहसील कार्यालयात लक्ष्मण बोराटे कार्यरत होते. त्यांच्याकडे संजय गांधी निराधार योजनाचा विभाग होता. या विभागातून काही दिवसांपूर्वीच आवक-जावकला त्यांची बदली झाली. त्या ठिकाणीही त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात येत होता, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. या छळाला कंटाळून त्यांनी राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गळफास घेतला. बोराटे हे वृद्ध आई, पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलासह राहत होते. त्यांची पत्नीही बँकेत नोकरीला असून, ती मुलासह माहेरी गेली होती. आई खालच्या खोलीत असताना त्यांनी वरच्या खोलीत गळफास घेतला. ही घटना सकाळी उघडकीस आली. माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुनील कऱ्हाळे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लक्ष्मण बोराटे यांना नातेवाइकांच्या मदतीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार देविदास राठोड करीत आहेत.

नातेवाइकांचा मृतदेह घेण्यास नकार –
सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. या मागणीसाठी सातारा पोलीस ठाण्यात रात्री साडेआठ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने जमाव जमला होता. नातेवाइकांनी घाटीत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासही नकार दिला. पोलीस ठाण्यात निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी नातेवाइकांची समजूत काढली. त्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.