हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे राज्य सरकारकडून मास्क सक्ती करण्यात आली होती. परंतु कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारकडून राज्यातील मास्कची सक्ती उठवण्यात आली. मात्र, आता पुन्हा कोरोनात वाढ होत असून जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची सौम्य लाट येण्याची शक्यता वर्तवत पुन्हा मास्क सक्ती करावीमी अशा मागणीचा प्रस्ताव टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.
देशातील दिल्ली, कनार्टक आणि या इतर काही राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे आता पुन्हा कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील टास्क फोर्सच्या सदस्यांची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर टास्क फोर्सच्या सदस्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यात आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा एक प्रस्ताव सादर केला. तसेच बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याची सक्त्ती करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी केली आहे.
कोरोना चाचण्या वाढविण्याचा सल्ला
टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या प्रस्तावाद्वारे अनेक सल्ले दिले आहेत. त्यामध्ये राज्यात सध्या कोरोनाच्या चाचण्या कमी होत आहेत. त्यामुळे या कोरोना चाचण्याची संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा. सध्या संसर्ग झालेली व्यक्ती ही रॅपिड टेस्ट करून स्वतःला घरातच विलग करत आहे. अनेकजण आरटीपीसीआर करणे टाळत असून त्या चाचण्यांवर भर देण्याची गरज असल्याचे टास्क फोर्सने सांगितले आहे.