करमाळा (सोलापूर) : घराच्या अंगणात पाणी का सोडले म्हणत मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार करमाळा शहरातील सिद्धार्थनगर भागात घडला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २८) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास करमाळा येथे घडली आहे. या प्रकरणी ४० वर्षीय महिलेने पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
पीडित महिला करमाळा येथील सिद्धार्ध नगर येथील घरातील पाण्याची टाकी साफ करत होती. तेव्हा उताराने शेजारील घराच्या अंगणात पाणी गेले. अंगणात पाणी का सोडले? यामध्ये गौतम कांबळे, मयूर गौतम कांबळे व दीपक कांबळे (सर्व रा. सिद्धार्थ नगर ,करमाळा) या आरोपींविरुद्ध 354, 354 (ए), 324, 34, 323, 504, 506 या कलमानुसार करमाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ही महिला शिक्षिका असून त्यांचे आई- वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला घरातील पाण्याची टाकी स्वच्छ करत होत्या. तेव्हा काही पाणी शेजारीला घराच्या अंगणात शिरले. त्यावरून त्यांनी वाद घालत शिवीगाळ केली व दगड व काठीने मारहाण केली.
दरम्यान फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी गेली तेव्हा आरोपीने अंगावरील कपडे फाडून मारहाण करून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी त्यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.