ठाकरे सरकार कोसळणार?, अमित शहांचं मोठं विधान !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सर्वच जणांनी लवकरच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे. या नेत्यांचा हा दावा ताजा असतानाच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शहा यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात येत आहेत.

अमित शहा यांनी एका आवृत्तवाहिनीला नुकतीच विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांना राज्यातील ठाकरे सरकार किती दिवस चालेल असा सवाल करण्यात आला होता. त्यावर शहा यांनी थेट उत्तर दिलं. शिवसेनेने आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला काहीही करावं लागणार नाही, असं शहा म्हणाले.

दरम्यान, याच मुलाखतीत शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीवर भाष्य करण्यास नकार दिला. शहा-पवार यांची नुकतीच भेट झाली होती. त्यावरून बरेच राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. त्याच भेटीचा तपशील सांगण्यास शहांनी नकार देऊन पुन्हा एकदा या भेटीचा सस्पेन्स वाढवला आहे.

शहा यांनी अगदी मोजक्याच शब्दात आपली भूमिका मांडली आहे. परंतु, त्यातून त्यांनी शिवसेनेला डिवचले आहेत. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेला छोटा मित्र पक्ष म्हटलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीत शिवसेना हाच मोठा पक्ष राहिला आहे. किंबहुना शिवसेनेच्या खांद्यावरच राज्यात भाजप मोठा झाला आहे. फक्त गेल्या दहा वर्षात राजकीय वारं बदलल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसला. त्यामुळेच शहा यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी शिवसेनेला छोटा मित्र पक्ष म्हटलं आहे, असं राजकीय निरीक्षक सांगतात. ठाकरे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी थेट भाजप सरकार पाडणार असं म्हटलं नाही. मात्र, ठाकरे सरकार कोसळणार हे सांगून त्यांनी बरेच संकेत दिले आहेत, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. त्यामुळे शहा यांच्या वक्तव्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

You might also like