अजित पवार आणि त्यांच्या गटाला अडकवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली अन् संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. पवारांच्या या धक्कातंत्राने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी अचानक असा निर्णय का घेतला हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातुन भाष्य केले आहे. अजित पवार आणि त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडकवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले काय ? असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल –

पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्याच नावाने उभा आहे व चालला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर सभागृहातील उपस्थितांत भावनाकल्लोळ झाला. त्यात जयंत पाटील यांनीच खरे सांगितले. पाटील यांना अश्रू अनावर झाले व म्हणाले, ‘तुम्ही म्हणजेच पक्ष आहात. आम्ही तुमच्याकडे बघूनच राजकारणात आलो व तुमच्याच नावानं मतं मागतो. तुम्हीच नसाल तर आम्ही तरी पक्षात का राहायचे? आम्हीही राजीनामे देतो!’ जयंत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या व त्या खऱ्या आहेत. पवारांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याची ‘सांगता’ अशा काही धक्कादायक प्रकाराने होईल याची पुसटशी कल्पनाही नसावी. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला. पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी विलापी भाषा केली. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे व पक्ष अशा तऱ्हेने फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा सेक्युलर विचार पवारांच्या मनात आला असेल तर त्यात चुकीचे नाही. असं ठाकरे गटाने म्हंटल.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे व राज्याच्या वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला. पवार हे पूर्णवेळ राजकारणी. अशा राजकीय माणसाने राजीनामा देऊन खळबळ उडवावी यामागचे राजकारण काय? याचा शोध काही जण घेऊ लागले तर आश्चर्य नाही. पक्षातील ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे काय? हा पहिला प्रश्न. दुसरे म्हणजे, अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडकवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले काय? हा दुसरा प्रश्न

राज्यातील अनेक नेते आज कुंपणावर आहेत व त्यातील अनेक नावे पवारांच्या पक्षातली आहेत. याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळ्य़ात जास्त विलाप केला. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळय़ांना उघडे केले. मळभ व हवा स्वच्छ केली. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत असा हा विषय असला तरी श्री. शरद पवार हे या घडामोडींचे नायक आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रात हालचाली सुरूच राहतील. पवार हे राजकारणातले भीष्म आहेत, पण भीष्माप्रमाणे आपण शरपंजरी पडलेले नसून सूत्रधार आपणच आहोत हे त्यांनी दाखवून दिले आहे! असं सामनातून म्हंटल आहे.